Ad will apear here
Next
थंडीचे दिवस


थंडीच्या दिवसांना आपला एक असा अंगचा वास असतो, वाळक्या पानांच्या शेकोटीच्या कुरळ्या कुरळ्या धुराचा तिखट-गोड वास, नुकत्याच कापलेल्या साळीच्या शेतात रेंगाळणारा ओल्या भाताचा उबदार गंध, लाल-पिवळ्या झेंडूच्या फुलांचा उग्र दरवळ, नुकत्याच कढवलेल्या साजूक तुपाचा वास, तिळाच्या वडीचा नाक आणि जीभ चाळवणारा खरपूस वास, वाफाळणाऱ्या गवती चहाचा, गाई-गुरांच्या गोठ्याचा, भरभरून फुलणाऱ्या आम्रमंजिऱ्यांचा, डोंगराच्या गालावरची सोनेरी लव होऊन हलणाऱ्या गवताचा, सकाळच्या गुलाबी थंडीत उबेसाठी लपेटून घेतलेल्या आईच्या जुनेराचा, आजीने महिनाभर खपून हाताने शिवलेल्या गोधडीचा आणि संध्याकाळी तुळशीपाशी लावलेल्या निरांजनाचा. हे सगळे वास, सगळ्या संवेदना माझ्या असण्याचाच एक भाग आहेत, म्हणूनच अर्धं जग फिरले तरी रुजायला आपल्या मातीतच यावं लागलं.

गोव्यात तशी हुडहुडी भरायला लावणारी थंडी कधी पडतच नाही; पण सकाळी आणि संध्याकाळी हवेत एक हवाहवासा वाटणारा गारवा येतो. पहाटे जाग आली तरी अंगावरच्या गोधडीत अजूनही गुरफटून झोपावं असं वाटायला लागतं. बाजारात भरपूर चकचकीत झिग टाकून केलेल्या शेवंतीच्या पिवळ्याधमक वेण्या विकायला येतात. आता गोव्यात बायकांच्या डोक्यात फारशी फुलं दिसत नाहीत; पण विकायला ठेवलेल्या वेण्या जरी बघितल्या तरी मला आपल्या भरगच्च अंबाड्यावर दोन-तीन वेगवेगळ्या वेण्या माळून मगच घराबाहेर पडणाऱ्या माझ्या आजीच्या पिढीतल्या बायका आठवतात. ह्याच दिवसांत गोव्याच्या देवळांच्या जत्रा भरतात. 

रात्री उशिरा रथाला जाऊन परत येता येता एखाद्या खाजेकाराच्या दुकानात जाऊन नुकतेच कढईतून काढलेले, भरपूर पांढरे तीळ टाकलेले, आल्याच्या तिखट वास असलेले गरमागरम केशरी खाजे खाणे हा तर एक खूप मोठा आनंद! जत्रेचे खाजे आणि फेस्ताचे चणे ज्या माणसाला अजिबात आवडत नाहीत तो हाडाचा गोंयकारच नव्हे. 

थंडीचे दिवस आले, की मला माझ्या आत्याचं घर आठवतं. तिचं घर पैंगीणजवळच्या तिरवण गावात आहे. गावात म्हणण्यापेक्षा गावाबाहेरच्या रानातच. घरामागे घनदाट कुळागर, वाऱ्यावर डोलणाऱ्या सडपातळ पोफळी आणि माडांची दाटी, मधूनच वाहणारं निवळशंख पाटाचं पाणी, आंब्या-फणसाचे मोठमोठे वृक्ष आणि त्यापलीकडे घनदाट रान. रात्र पडली की आत्याचं घर सोडून जवळ कुठे दुसरा दिवा दिसायचा नाही. डोक्यावर नक्षत्रांची रास ओतणारं आभाळ आणि स्वच्छ सारवलेल्या खळ्यात घातलेल्या सतरंजीवर पहुडलेली आम्ही सगळी मुलं. आत्याकडे नारायण नावाचा एक माणूस कामाला होता, तो हमखास रात्री भुतांच्या गोष्टी सांगायचा. शेजारच्या मोठ्या जांबाच्या झाडावर कधी कधी काजवे दिसायचे. रातकिड्यांचा आवाज तर वेदघोषासारखा अखंड आसमंतात घुमायचा. कधी-कधी एखाद्या जंगली श्वापदाचे आवाज ऐकू यायचे. ‘वाघरू ते’, आत्या सांगायची. 

घराभोवती गर्द रान असल्यामुळे तिरवणला थंडी चांगलीच जाणवायची. नारायणच्या भुतांच्या, म्हारू-देवचारांच्या गोष्टी ऐकता ऐकता अंगावरची गोधडी पार गळयापर्यंत ओढून घ्यायची मी. अंगावर शहारा यायचा तो थंडीमुळे की त्या गूढरम्य वातावरणामुळे ते आता सांगता यायचं नाही. घराभोवती रान असल्यामुळे तिरवणला थंडी चांगलीच जाणवायची. 
पुढे गोवा सोडून पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्याला आले तेव्हा खऱ्या अर्थाने थंडीशी तोंडओळख झाली. मी विद्यापीठाच्या आवारात वसतिगृहात राहायचे. पुणे विद्यापीठाचं आवार इतकं विस्तीर्ण आणि सुंदर आहे की कितीही भटकलं तरी कमीच वाटेल. मेन बिल्डिंगच्या समोरच्या उद्यानात एक महाकाय गोरख चिंचेचा वृक्ष होता. दहा माणसांना त्याचं खोड कवेत घेता येणार नाही एवढा त्याचा घेर. तो वृक्ष मला सदैव घरातल्या एखाद्या प्रेमळ, वडिलधाऱ्या, ऋषीतुल्य व्यक्तीसारखाच भासला. माझा लाडका बाओबाब होता तो. थंडीच्या दिवसांत सकाळी फिरून येऊन कितींदा तरी मी त्या बाओबाबाखाली एकटीच बसलेय. 

त्याच्या खोडामध्ये एक प्रचंड ढोल होती. चार माणसं ऐसपैस पाय पसरून झोपू शकतील एवढी मोठी. त्या झाडावर नेहमी हॉर्नबिल पक्षी गर्दी करायचे. थंडीच्या दिवसात तर कल्लाच असायचा तिथे. त्या बाओबाबाला कितीदा तरी मी माझ्या मनातल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रेमात पडले तेव्हाही आम्ही त्या बाओबाबाखालीच बसायचो, तासन् तास गप्पा मारायचो. आमच्या पुढच्या आयुष्याची बरीचशी चित्रं आम्ही दोघांनी तिथे त्या बाओबाबाच्या साक्षीने रंगवली आहेत. 
पुढे मुलं झाल्यानंतर जेव्हा मी अमेरिकेहून पुण्याला राहायला आले तेव्हा माझ्या वर्षाच्या लेकरांना घेऊन मी बाओबाबाला भेटायला गेले होते. त्याला म्हटलं, ‘बघ, तुला कधी वाटलं होतं का, की मी तीन पिल्लांना घेऊन तुझ्या भेटीला येईन?’ बाओबाबाने फांद्या हलवून माझ्या पिल्लांना आशीर्वाद दिला. 

पुढे मी पुण्यात पाच वर्षं होते. आठवड्यातून एकदा तरी आम्ही बाओबाबाला भेटायला जायचोच. माझ्या मुलांचे अक्षरशः शेकडो फोटो आहेत माझ्याजवळ बाओबाबाच्या सावलीत खेळतानाचे. हल्लीच मला कुणीतरी सांगितलं की गेल्याच वर्षी तो बाओबाबा उन्मळून पडला. खूप रडले मी त्या दिवशी. त्यानंतर विद्यापीठात जायचा धीरच नाही झाला. 

मेन बिल्डिंगच्याच आवारात एक सिल्क-कॉटनचं अतिप्रचंड झाड आहे, उंचच उंच वाढलेलं. थंडीच्या दिवसांत त्या झाडाची तळहाताएवढी लालभडक फुलं खाली हिरवळीवर पडलेली असायची. त्या झाडाखाली एक सिमेंटचं बाक होतं. सकाळी त्या बाकावर बसलं की अगदी कपड्यातून देखील तो गारढोण स्पर्श जाणवायचा; पण हळूहळू सूर्याची तिरपी, मऊ, प्रेमळ किरणे अंगावर यायची आणि सगळी सकाळ उबदार होऊन जायची. 

पुढे नोकरीच्या, कामाच्या निमित्ताने खूप वेगवेगळ्या प्रांतातली, देशांमधली थंडी उपभोगायला मिळाली; पण का कोण जाणे, थंडीचे दिवस म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते ती फातर्पेची जत्रा, तिरवणचं ते आश्रमासारखं घर, आत्याच्या नऊवारी लुगड्याला येणारा हळदीचा वास आणि माझा लाडका बाओबाबा! 

- शेफाली वैद्य

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IUPCCV
Similar Posts
माणूस नावाचं झाड सायकलकडे तो परत येताना ती इवली पिल्लं शेवटी हलवत त्याच्या मागे मागे येत होती. ‘अभी कल आना,’ मायेने भिजलेल्या स्वरात तो हसत त्या पिल्लांना म्हणाला. त्याच्यामधला हा चांगुलपणा मला आत खोलवर कुठे तरी स्पर्शून गेला.
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला
पानगळ हे बागडणं, नाचणं, समर्पण, उगवणं, फुलणं, फळणं आणि कोमेजणं‌.... पुन्हा पुन्हा अखंड चालू आहे. परमेश्वराचं अस्तित्व आहे तोपर्यंत! हा चैतन्याचा प्रवाह असाच अखंड वाहत राहील. पानगळीतून वसंत फुलत राहील!!!
आई! आई... तब्बल दहा वर्षं या शब्दाचा कल्पनाविस्तार करण्याचा मी प्रयत्न करतोय. हजारो विचारांचे गुच्छ त्यासाठी आनंदाने समोर येऊन हात जोडून उभे राहत होते. आम्हालाही वापर.. म्हणत! पण काय होत होतं माहीत नाही. आपल्याकडे शब्दांचा पुरेसा साठा नाही, असंच सतत वाटत राहायचं. आज, या क्षणालाही तसंच वाटतंय. पण तरीही ठरवलं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language